Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
Search Tag:     From Date:     To Date:     Section:    
Total Results: 36
एकदा एका सिंहाने आणि गाढवाने भागीदारीत शिकार करण्याचे ठरवले. हिंडता हिंडता ते रानटी मेंढराच्या एका गुहेपाशी आले. सिंह गाढवाला म्हणाला, ‘आपण असे करूया, मी गुहेच्या बाहेर उभा राहतो. तू आत जाऊन जोरजोरात ओरडायला सुरुवात कर. सगळ्या रानटी मेंढ्या घाबरून बाहेर येतील आणि मग मी त्यांचा फडशा पाडतो’, असे म्हणून सिंह बाहेर गुहेच्या दारापाशी पाळतीवर राहिला. गाढवालाही सिंहाची युक्ती पटली आणि त्याने आत घुसून मोठ्याने खिंकाळण्यास सुरुवात केली. रानटी मेंढ्या गाफील होत्या, त्यांना असा हल्ला अपेक्षितच नव्हता. नंतर त्याने आत जोरदार गोंधळ माजविला की, त्यामुळे सर्व मेंढेरे बाहेर पडली आणि आयतीच सिंहाच्या तावडीत सापडली. सिंहाने बहुतेक सर्वांना पकडून मारले. शेवटी गाढव बाहेर आले आणि दमून धापा टाकत सिंहाला म्हणाले, काढलं की नाही सगळ्यांना बाहेर? कसं काय वठलं नाटक?’ ‘अरे, विचारतोस काय?’ सिंह खो खो हसत म्हणाला, ‘खरं सांगायचं म्हणजे तू गाढव आहेस, हे मला माहीत नसते तर स्वत: मीसुद्धा तुला घाबरलो असतो पण यातील मांसाचा एकही तुकडा तुला मिळणार नाही आणि जास्त बोलशील तर तुलाही खाऊन टाकेन. जा इथून.
Monday, November 20, 2017 AT 09:10 PM (IST)
एका शहरात एक वेड्यांचे इस्पितळ होते. तेथील वेडे पहावे म्हणून एक माणूस इस्पितळात गेला. त्याने अनेक वेडे पाहिले. त्यांच्यापैकी त्याने एक तरुण व सुरेख वेडा पाहिला. त्याच्या शेजारी बसून त्याने त्याला विचारले की, ‘अरे, तू येथे कसा आलास?’ तो तरुण म्हणाला, ‘तुमचा हा प्रश्‍न बरोबर नाही पण त्याचे उत्तर मी देतो. त्याचे असे झाले, मी लहानपणापासून बुद्धिमान होतो त्यामुळे माझ्या वडिलांना वाटे मी मोठा विद्वान व्हावा. माझ्या आईला वाटे मी मोठा श्रीमंत व्हावा. माझ्या शिक्षकांना वाटे मी मोठा पुढारी व्हावा. माझ्या गायनशिक्षकाला वाटे मी मोठा गवई व्हावा. या सार्‍या गोंधळामध्ये माझा मी हरवून बसलो. माझे मन कशातच लागेना म्हणून एका डॉक्टरच्या सल्ल्याने मला येथे आणून सोडले. येथे मला बरे वाटते. कारण माझा मी माझ्यापाशी असतो. माझ्याबद्दल मी विचार करू शकतो.’ हे सांगून तो मानलेला वेडा क्षणभर थांबला आणि त्याने त्या माणसाला विचारले की, ‘शिक्षण, स्पर्धा आणि महत्त्वाकांक्षा यांच्यापायी वेड लागून तुम्ही येथे आलात काय?’ तो म्हणाला, ‘नाही, तसे नाही. मला माझे वेड लागले आहे. त्या मीचे निरोगी स्वरुप दाखवणारा कोणी आहे काय ते पाहण्यास मी येथे आलो.
Saturday, November 18, 2017 AT 08:58 PM (IST)
एकदा एका गावात खूप मोठा उत्सव होता. मिरवणुकीची तयारी चालली होती. गावातील मोठमोठे लोक मिरवणुकीत सामील झाले होते. ज्या रस्त्यावरून मिरवणूक जाणार होती त्या रस्त्याची सफाई करण्यात येत होती. सगळीकडे रोषणाई केली होती पण अचानक त्या स्वच्छ रस्त्यावर एका कुत्र्याने मलविसर्जन केले. सेवक अवाक् झाले. काही क्षणात मिरवणूक येतच होती. अत्यंत कमी वेळ होता. त्यामुळे सेवकांना काय करावे सुचेना. कुत्र्याच्या मलाचा दुर्गंध येऊ नये व ते दिसू नये म्हणून एका सेवकाने एक युक्ती केली. मिरवणुकीसाठी सुगंधी व सुंदर फुले आणलेली होती. त्यातील काही फुले त्यावर टाकून ते मल झाकून टाकले. मिरवणूक आली. मध्येच फुले वाहिलेलं ते ठिकाण पाहून व देवतास्थान समजून प्रत्येकाने काहीही विचार न करता त्यावर फुले वाहिली व नमस्कार करून जाऊ लागले. लोकांचा हा मूर्खपणा पाहून सेवक मनात हसला. कथा उपदेश : गतानुगतिक न बनता विचार व चिकित्सा करून भक्ती करावी. अंधानुकरण करू नये.
Thursday, November 16, 2017 AT 08:59 PM (IST)
तरुण पती तीर्थयात्रेस निघाला. पत्नी विरहाच्या आशंकेने व्याकुळली. तिचे मन वळवण्याची बरीच खटपट केली. पण नवरोजी बधले नाहीत. अखेर तिने तब्बेतीची काळजी घ्या, असे काकुळतीने विनविले. आईने घरगुती वनस्पतींचे बाळकडू पाजलेले. त्यामुळे एक तोडगा तिला आठवला. जाण्याच्या वाटेवर नेहमी चिंचेच्या झाडाखाली झोपत जा नि परतीच्या वाटेवर आठवणीने निंबाखाली’. तसे तिने पतीकडून वचन घेतले. दोन महिने तरी पतिराज दूर राहणार होते. पण आता निश्‍चित होती. तिच्या मनासारखे झाले. नवरा पंधरा दिवसांनीच परतला. इंगित असे की, चिंचेच्या छायेत झोपल्यास सर्दी-पडशाला, हिवतापाला आवतण दिल्यासारखे होते. जाताना तसे केले नि आजारी पडून त्याने परत फिरायचे ठरवले. मजल दरमजल करत परत फिरताना त्याने वचन दिल्याप्रमाणे कडुनिंबाचा आसरा घेतला नि त्याची बिघडलेली तब्येत सुधारली. पत्नीचा हेतू साध्य झाला. याचा अर्थ असा नव्हे की, निंबाची झाडे लावली तर गावात दवाखान्याची गरज सरली ! कथा उपदेश : वनस्पतींचे गुणधर्म उमजून त्या आपण अधिक वापरायला शिकावे, इतकेच.
Wednesday, November 15, 2017 AT 08:57 PM (IST)
महात्मा गांधीजी आफ्रिकेतलं काम संपवून ज्या दिवशी मुंबईस परत आले त्या दिवशीची ही गोष्ट. मुंबईच्या वृत्तपत्रांचा एक बातमीदार थेट मुंबई बंदरावरच गांधीजींना भेटला. गांधीजी बोटीतून उतरून धक्क्यावर येताच, तो पुढे जाऊन गांधीजींना म्हणाला, ‘गुड मॉर्निंग, मिस्टर गांधी !’ तो इंगˆजीत बोलू लागताच त्याला गांधीजींनी हटकलं. ते त्याला म्हणाले, ‘अरे भाई, तुम्ही हिंदी आहात नि मीही हिंदीच आहे. तसंच तुमची नि माझीही मातृभाषा गुजरातीच आहे. मग का उगीच इंगˆजीत बोलता? का तुम्हाला असं वाटलं की एकवीस वर्षे आफ्रिकेत राहिल्यामुळे आपली मातृभाषासुद्धा मी आता विसरलो असेन म्हणून? का बॅरिस्टरशी बोलताना इंगˆजीतच बोलण्यात तुम्हाला मोठेपणा वाटतो?’ गांधीजींच्या या अनपेक्षित प्रश्‍नांनी तो बिचारा बातमीदार तर चक्क गारठलाच अन् तो चकितही झाला. दुसर्‍या दिवशी आपल्या वृत्तपत्रात छापलेल्या गांधीजींच्या त्यांच्या मुलाखतीत या त्यांच्या प्रश्‍नापासूनच त्यानं सुरवात केली होती. कथा उपदेश : एकमेकाशी बोलताना आपण आपल्या मातृभाषेत बोलायचं. ते जर शक्य नसेल तर राष्ट्रभाषेत बोलायचं अन् तीही येत नसली तरच निरुपाय म्हणून इंगˆजीत बोलावे.
Saturday, November 11, 2017 AT 09:20 PM (IST)
1 2 3 4 5 ...
 
© Copyrights 2010 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: